आयपीओ धमाका, दोन महिन्यांत 10 आयपीओ

आयपीओ धमाका, दोन महिन्यांत 10 आयपीओ

    मुंबई (21 सप्टेंबर) : कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊनमुळे सगळीकडे मंदीचे वातावरण आहे. व्यापार, उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांनी उत्पादन क्षमता कमी करून कामगार कपात केली आहे. त्याचे परिणाम भारतीय शेअर मार्केटवर देखील मोठ्या प्रमाणात दिसून मार्केटमध्ये घसरण झाली. एवढंच नाही तर याचा धसका नविन येणार्या कंपन्यांनीही घेतलेला दिसला. 

    चालू वर्ष 2020मध्ये मार्चपासून म्हणजे लॉकडाऊननंतर जुलै दरम्यान एकाही नविन कंपनीने मार्केटमध्ये प्रवेश केला नाही. एकाही कंपनीचा आयपीओ आला नाही. सहा महिन्यांपूर्वी 2 मार्चला एसबीआय कार्डचा आयपीओ आला होता. हा या वर्षांतील एकमेव आयपीओ होता. परंतु जुलैमध्ये अनलॉकडाऊन सुरू होताच मार्केट थोडे सावरताना दिसले आणि आयपीओ येण्यास सुरूवात झाली. गेल्या दोन महिन्यांत तब्बल 9 आयपीओ आले आहेत आणि 1 येणार आहे. चालू सप्टेंबर महिन्यात प्रमाण वाढून 7 आयपीओ येत आहेत. सध्या 22-23 सप्टेंबर या दोन दिवसांत चक्क केमकॉन स्पेशालिटी केमिकल्स लिमीटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस लिमीटेड आणि एन्जल ब्रोकींग लिमीटेड हे 3 आयपीओ बुकींगसाठी उपलब्ध आहेत.

    जानेवारी ते मार्चदरम्यान एकमेव म्हणजे एसबीआय कार्डचा आयपीओ आला होता. त्यानंतर जुलैपासून दोन महिन्यांत रोजरी बायोटेक, येस बॅंक (एफपीओ), माईन्डस्पेस बिजनेस पार्क्स, हॅपिएस्ट माईन्ड्स टेक्नॉलॉजी, रुट मोबाईल, केमकॉन स्पेशालिटी केमिकल, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस आणि एन्जल ब्रोकींग असे 8 आयपीओ आले आहेत. तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स, युटीआय आणि लिखीथा इन्फ्रास्ट्रक्चर येत आहेत. या महिन्यात आलेल्या आयपीओपैकी हॅपिएस्ट माईन्ड्स टेक्नॉलॉजी आणि रुट मोबाईलला जोरदार प्रतिसाद मिळाला व त्यांचे लिस्टींगही जोरदार झाले.

    मागील वर्षी 2019 मध्ये एकूण 17 कंपन्यांचे आयपीओ आले होते. चालू वर्ष 2020 मध्ये आयपीओद्वारे 12 नविन कंपन्या शेअर मार्केटमध्ये येत असताना दिसत आहे. आता हे वर्ष संपण्यास अजून 3 महिने बाकी आहेत बघुया येत्या 3 महिन्यांत किती कंपन्या नविन येतील ? आणि 2019 चा आकडा ओलांडला जाईल का ?

News-In-Focus