म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय ? इकडे लक्ष द्या

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय ? इकडे लक्ष द्या

    पाच वर्षापूर्वी म्युच्युअल फंड नियामक मंडळाने फंड कंपन्यांना ग्राहक किंवा गुंतवणूकदारांना कुठल्याही मध्यस्थाशिवाय म्युच्युअल फंडाच्या कुठल्याही योजनेत थेट  गुंतवणूक करता यावी, यासाठी ‘डायरेक्ट म्युच्युअल फंड’ सुरू करण्याचे आदेश दिले होते. गेल्या पाच वर्षात सुज्ञ गुंतवणूकदारांना डायरेक्ट किंवा थेट म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे फायदे लक्षात आले आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदार कुठल्याही फंडामध्ये आता थेट गंतवणूक करू शकतो. कारण ही प्रक्रिया अत्यंत साधी, सोपी आणि विनाखर्चिक आहे. या गुंतवणूकीत कोणालाही कमिशन द्यावे लागत नाही. 
    डायरेक्ट म्युच्युअल फंड पर्याय सर्वांनाच फायदेशीर आहे का? : थेट म्युच्युअल फंडचा अर्थच जास्तीचा फायदा असा होतो. कारण त्यातून जादा परतावा मिळतो आणि कोणाला कमिशनही द्यावे लागत नाही. प्रश्‍न हा उरतो की थेट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा मिळतो? या प्रकारच्या गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा रेग्युलर म्युच्युअल फंड स्कीमपेक्षा निश्‍चितच जादा असतो आणि जर आपण गुंतवणूक सातत्याने व खूप वर्षे करीत राहिलो, तर  भरभक्‍कम परतावा मिळतो, यात दुमतच नाही. 
    मग आपल्या मनात प्रश्‍न येईल की, मग काय थेट म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक सरसकट सर्वानाच फायदेशी ठरते का? तर त्याचे उत्तर आहे, बिल्कुल नाही. रेग्युलर म्युच्युअल फंड आणि थेट म्युच्युअल फंडमधून मिळणार्‍या परताव्यामध्ये साधारणपण  एक ते दोन टक्क्यांचा फरक असतो. आपल्या लक्षात आले असेल की जो हा एक ते दोन टक्क्यांचा फरक आहे, ही रक्‍कम म्हणजे रेग्युलर प्लॅनमध्ये आपण ब्रोकरेज स्वरूपात डिस्ट्रीब्युटर किंवा फंड हाऊसला देत असलेले कमशिन होय. त्यामुळे स्वस्तात मिळणार्‍या थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे प्रत्येक गुंतवणूकदाराला फायद्याचेच ठरेल, असे नाही. थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला आपण ज्या फंडामध्ये गुंतवणूक करणार आहोत, त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 
    म्युच्युअल फंडासाठी द्यावा लागतो जीएसटी. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी फंड कंपन्या ग्राहकांना ठरावीक रक्‍कम आकारतात. साधारणपणे इक्‍विटी फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी साधारणपणे 1.75 ते 2.50 टक्के शुल्क आकारले जाते. त्याशिवाय त्यावर जीएसटीदेखील आकारला जातो. गुंतवणूकदारांकडून घेतल्या जाणार्‍या फीमधील काही रक्‍कम फंड कंपन्या आणि काही रक्‍कम फंडाची विक्री करणार्‍या ब्रोकरला मिळते. 
    गुंतवणूकदारासाठी योग्य पर्याय कोणता ? : आता आपण  रेग्युलर म्युच्युअल फंड आणि थेट म्युच्युअल फंडमधील योग्य पर्याय कसा निडायचा, ते पाहू. त्यासाठी आपण समजून घेतले पाहिजे की, गुंतवणूक करताना सल्‍लागाराची भूमिका किती महत्वाची आहे ते. एका अमेरिकन कंपनीने त्याबाबत यादी तयार केली आहे. त्यानूसार गुंतवणूक सल्‍लागाराला खालीलप्रमाणे भूमिका निभवावी लागते. 
    01) विश्‍वास संपादन करणे, 02) गुंतवणूकदाराला अपेक्षित परताव्यानूसार गुंतवणूकीचे नियोजन करणे, 03) गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ तयार करणे, 04) गुंतवणूकदाराची जोखीम शक्य तितकी कमी करणे, 05) शेअर बाजारातील मंदीच्या काळात सल्‍लागाराची भूमिका निभावणे.
    गुंतवणूकीबाबत गुंतवणूकदाराला काही मुलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. आपले परताव्याचे उद्दिष्ट्य, त्यासाठी गुंतवली जाणारी रक्‍कम, त्यातील जोखीम आणि त्यानूसार कुठला थेट फंड निवडावा, हे समजणे गरजेचे आहे. जर आपल्याला म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीबाबत काही माहिती नसेल, आपण गुंतवणूदार म्हणून नवखे असू तर मात्र थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे टाळावे. त्याएवजी रेग्युलर म्युच्युअल फंडचा पर्याय निवडावा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी जोखीम इतकेच त्यातील आपल्याला किती ज्ञान आहे, त्यावर रेग्युलर कि डायरेक्ट/थेट म्युच्युअल फंड हे पर्याय निवडणे सोपे होते आणि आपला फायदाही होतो.

(Published On 15/02/2020)

News-In-Focus