एसआयपी म्हणजे कमी जोखीम आणि जादा परतावा...

एसआयपी म्हणजे कमी जोखीम आणि जादा परतावा

    सिस्टेमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून कमी जोखीम स्विकारून आपल्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारात कधी तेजी असेल आणि कधी मंदी असेल? हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कारण शेअर बाजारात हजारो कंपन्या आणि कोट्यवधी गुंतवणूकदार व्यवहार करत असतात. कोण तेजीचा व्यवहार करतो आणि कोण मंदीचा.परंतु शेअर बाजारात दिर्घ मुदतीकरीता आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला अन्य कोणत्याही गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. त्यासाठी आपल्याकडे आर्थीक शिस्त आणि संयम असणे अत्यंत जरूरीचे आहे. 
    2018 मध्ये निफ्टीमधील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना सरासरी 10 टक्के इतका परतावा मिळाला. जो इतर कुठल्याही गुंतवणुकीतून मिळणार्‍या परताव्यापेक्षा नक्‍कीच जास्त होता.दिर्घ मुदतीसाठी इक्‍विटीमध्ये गुंतवणूक केल्यास 12 ते 14 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. जो अन्य पारंपरिक गुंतवणूकीपेक्षा जास्त आहे. सर्वसामान्य लोकांचे शेअर बाजाराबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामध्ये शेअर बाजार खूप अस्थिर असतात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज असते. आता वेळ आली आहे की, शेअर बाजाराबाबत असणारे गैरसमज दूर करण्याची आणि जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित करण्याची. 
    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वित्त वर्ष 2019 साठी कार्पोरेट सेक्टरने किती कमाई गृहीत धरली आहे. 2018 मध्ये कॉर्पोरेट सेक्टरची कमाई स्थिर होती. अपेक्षा आहे की 2019 मध्ये कॉर्पोरेटच्या कमाईत वाढ होईल. याचे मह्तवाचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात शेअर बाजारात प्रचंड तेजी असून कॉर्पोरेटची कमी मर्यादित होती. आतातर जीएसटीसारख्या आर्थीक सुधारणांमधूनही कॉर्पोरेट बाहेर पडला आहे. त्यामुळे कॉर्पोरेटच्या कमाईत वाढ अपेक्षित आहे. 2019 मध्ये निफ्टीत कॉर्पोरेटची कमाई साधारणपणे 12 ते 14 टक्के होवू शकेल. परंतू चीनअमेरिका ट्रेड वॉर किंवा अन्य काही कारणांमुळे कमाईवर ब्रेक लागू शकतो. 
    शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज असते, शेअर बाजाराचा किंवा गणिताचे आपल्याला ज्ञान हवे, असे सर्वसामान्य लोकांना वाटते. पण वस्तुस्थिती तशी बिल्कुल नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये इक्‍विटी गुंतवणूक हा सर्वात पहिला प्रकार मानला जातो. यामध्ये एखाद्या कंपनीचा शेअर कमी किंमतीमध्ये विकत घेणे आणि तो जास्त किंमत आल्यानंतर विकणे. दुसरा प्रकार म्हणजे सिस्टेमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). या प्रकारच्या गुंतवणूकीमध्ये दर महिण्याला ठरावीक रक्‍कम दिर्घकाळासाठी गुंतवत रहायचे. यामध्ये आपण शेअर बाजारातील तेजी अथवा मंदीकडे ढुंकूनही बघायचे नाही. आपण फक्‍त सातत्याने गुंतवणूक करत रहायचे. यामध्ये काही ठरावीक वर्षानंतर आपल्याला चांगला परतावा मिळतो. या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी विविध फंड हाऊस, ब्रोकरेज कंपन्या कार्यरत आहे. त्यांच्यावर  सेबी या संस्थेचे नियंत्रण असते. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास महागाई दरावर मात करून चांगला परतावा मिळतो. 
(Published On 22/02/2020)

News-In-Focus