विकली आउटलूक : अस्थिरतेचे नवे सत्र 

विकली आउटलूक : अस्थिरतेचे नवे सत्र 

मुंबई (9 फेब्रुवारी) : गेल्या आठवडाभरातील पहिल्या चार सेशन्समधील तेजीमुळे बजेटदिवशी झालेल्या नुकसानीची सुमारे 75 टक्क्यांपर्यंतची भरपाई मार्केटने केली आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरच्या सत्रात प्रॉफीट बुकिंगचे चित्र दिसले. आता आगामी आठवड्यात स्थानिक आणि जागतिक घडामोडी, करोना व्हायरसला अटकाव यातून मार्केटमध्ये तीव्र उतार-चढाव राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 
केंद्रीय बजेटमध्ये सरकारने लाँग टर्म सुधारणांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसले. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तरलता प्राप्त होण्यासाठी काही सुधारणा केल्या आहेत. आगामी आठवड्यात करोना व्हायरसचा ग्लोबल इम्पॅक्ट काहीसा कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मार्केटचा मूड तीव्र उतार-चढावांचा राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आठवडाभरात सेन्सेक्सने 3.5 टक्क्यांची वाढ मिळवत 41,141.85 चा टप्पा गाठला तर निफ्टी 50 ने 3.74 टक्क्यांची झेप घेऊन पुन्हा 12,098.35पर्यंत स्थान मिळवले. बीएसईचे मीडकॅप इंडेक्सही पाच टक्क्यांपर्यंत वर सरकले आहेत. बीएसईचे ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर अँड रिटेल हे प्लसमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे मार्केटचा मूड अस्थिरतेचा राहील अशी शक्यता आहे. 
बजेटनंतरच्या पडझडीला रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे ब्रेक लागला आहे. देशांतर्गत कंपन्यांचे तिमाही निकाल अखेरच्या टप्प्यावर आले आहेत. त्यामुळे मार्केट जागतिक मूडवर हालचाल करेल. त्यातही करोना व्हायरसच्या इम्पॅक्टवर त्याची मदार अवलंबून असेल. फॉरेन इन्स्ट्यिट्यूशन इन्व्हेस्टर्सनी या आठवड्यातही विक्रीचा मारा केला. त्यांनी आठवडाभरात सुमारे एक हजार कोटींच्या शेअर्सची विक्री केली. मात्र, डोमॅस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे 2,200 कोटींच्या शेअर्सची खरेदी केल्याने मार्केट सावरले आहे. 
येत्या आठवड्यात कंपन्यांच्या तिमाही निकालांचा चांगलाच परिणाम जाणवणार आहे. अद्याप सुमारे अडीच हजार कंपन्यांकडून त्यांचा तिमाही आर्थिक आढावा प्रसिद्ध केलेला नाही. यात निफ्टी 50मधील गेल, कोल इंडिया, हिंडाल्को इंडस्ट्रीज, बीपीसीएल, ओएनजीसी आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. पॉवर फायनान्स कार्पोरेशन, आयडीबीआय बँक, एनबीसीसी, व्हीआयपी इंडस्ट्रिज, आयआरसीटीसी, व्होडाफोन आयडिया, श्री सिमेंट, ग्रासीम, मदरसन सुमी सिस्टीम, नॅल्को, बजाज कन्झ्युमर केअर, जीआयसी हाउसिंग फायनान्स, अलाहाबाद बँक, अशोल लेलँड, युनीयन बँक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, अदानी ट्रान्समिशन, लक्ष्मी विलास बँक अशा काही कंपन्यांचाही यात समावेश आहे. त्यांच्या निकालानंतर मार्केटचा मूड बदलू शकतो. 
देशांतर्गत औद्योगिक उत्पादनाचा वाटा आणि रिटेल इन्फेक्शन यांची आकडेवारी अद्याप जाहीर आहे. त्यानुसार मार्केटमध्ये बदल होतील. रिटेल इन्फ्लेशन डिसेंबरमध्ये 7.35 टक्क्यांनी वाढले. रिझर्व्ह बँकेच्या टार्गेटपेक्षा त्यात चार टक्के अधिकची वाढ झाल्याने आरबीआयने काही निर्णय फेब्रुवारीच्या पॉलिसीमध्ये घेतले आहेत. त्याचा परिणाम आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सत्रात होईल. नोव्हेंबरमध्ये चार टक्क्यांच्या आसपास असलेले इंडस्ट्रियल उत्पादन दोन टप्प्यांच्या आसपास आले. मात्र, त्याची एकूण स्थिती काय असेल यावर तज्ज्ञांचा वॉच आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालांचीही मार्केटला उत्सुकता आहे. मंगळवारी त्यांच्या निकालांची घोषणा होईल. आतापर्यंतच्या एक्झिट पोल्सनी सत्तारुढ आम आदमी पार्टीलाच पुन्हा बहुमत मिळू शकेल असे जाहीर केले आहे. हा निकाल तसाच राहणार की बदलणार यावर मार्केटचा मूड बदलू शकेल. 
चीनच्या करोना व्हायरसने भारतीय आणि अमेरिकन मार्टेमध्येही बरीच अस्थिरता आणली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ लागला आहे. चीनमधील अनेक औद्योगिक उत्पादने बंद पडली असून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होण्याची भीती जागतिक पतमानांकन संस्थांनी वर्तवली आहे. करोना व्हायरसने आतापर्यंत सुमारे आठशेहून अधिक लोकांचे बळी घेतले असून सुमारे तीन हजाराहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाल्याचे सांगण्यात येते. भारतासह थायलंड, फिलिपाइन्स, संयुक्त अरब अमिरात आदी देशांना यापासून धोका असल्याने भीतीचे वातावरण आहे. 
या बदलत्या स्थितीने भारतीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर अधिक परिणाम झाला आहे. भारत सुमारे 80 टक्क्यांपर्यंत तेलाची आयात केली जाते. सध्या या दराची घसरण झाली आहे. प्रतिबॅरल 55 डॉलरपर्यंत दर गेल्या आठवड्यात होते. आता ते याच पातळीवर स्थिर राहतील अशी शक्यता आहे. भारतीय रुपयाही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अस्थिरच राहील आहे. ही स्थिती कायम राहील अशी शक्यता आहे. रुपया 71 ते  72 यांदरम्यान राहील. त्यामुळे प्रॉफिट बुकींगचा ट्रेंड येऊ शकतो असाही अंदाज आहे.  
टेक्निकली निफ्टी गेल्या आठवड्यात 11,660 ते 12,000 यांदरम्यान होती. मात्र आता बेअरिश ट्रेंड दिसून येत आहे. या आठवड्यातही प्रॉफिट बुकिंग होऊ शकेल. त्यामुळे 12,000 ते 12,200 चा टप्पा निफ्टीसाठी अवघड आहे.  फ्युचर आणि ऑप्शनमध्येही अशीच स्थिती राहील असे तज्ज्ञांना वाटते. 

News-In-Focus