कोरोनाचा फटका : एसआयपी म्युच्युअल फंडात घसरण  

कोरोनाचा फटका : एसआयपी म्युच्युअल फंडात घसरण  
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक स्तरावर प्रचंड हानी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसला आहे. जून महिन्यात एसआयपीच्या घटलेल्या आकडेवारीने हे वास्तव समोर आणले आहे.  
कोरोना महामारीमुळे सर्वच स्तरातील नागरिकांसह नोकरदार, व्यापारी वर्गाला जबर फटका बसला. अनेकांच्या पगारात कंपन्यांनी कपात केली आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक ठिकाणी कंपन्या, खासगी आस्थापनांकडून नियमीत वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. एसआयपीच्या माध्यमातून होणारी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक घटल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांनीही आर्थिक स्तरावर खर्चाचे वेगळे नियोजन केल्याचे दिसून येत आहे. 
डिसेंबर 2018 पासून गुंतवणूकदार यामध्ये दर महिन्याला 8000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करीत होते. मात्र जून महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून सुरू असलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक घसरली. गेल्या 18 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. जून महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात 7927 कोटींची गुंतवणूक झाली. कॅश फ्लो कमी होण्यासह काही फंड हाउसेसनी गुंतवणूकदारांना एसआयपी तूर्त स्थगित करण्याची सुविधा दिली. या स्कीममध्ये एसआयपी तीन ते चार महिने थांबवण्याची सोय आहे. त्यामुळेही एसआयपीतील गुंतवणूक घटली आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही स्थिती बदलेल अशी आशा आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एसआयपीतील गुंतवणूकीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत नव्या एसआयपीची नोंदणी वाढली आहे. लोकांकडून फक्त कमी रक्कमेची गुंतवणूक सुरू आहे. 
फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडातही जून महिन्यात अधिक घसरण झाली. लिक्विडीटी स्कीममुळे ही घट झाल्याचे म्हटले जाते. या कॅटॅगिरीत एका महिन्यात फक्त 2,862 कोटी रुपये गुंतवले गेले. लिक्विड स्कीम्स आणि क्रेडिट रिस्क फंड्समधून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याचेही दिसून आले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार फिस्क्ड इन्कममधून म्युच्युअल फंडात होणारी मे महिन्यातील गुंतवणूक 63,665 कोटी रुपये होती. ती जून महिन्यात फक्त 2,862 कोटी रुपये झाली. एप्रिल महिन्यात याच सेगमेंटमधील गुंतवणूक 43,431 कोटी रुपये होती. मात्र महिन्यात गुंतवणूकदारांनी विक्रमी, 1.95 ट्रिलीयन रुपये काढून घेतले. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारीत सर्वाधिक गुंतवणूक या प्रकारात झाली होती. फिक्स्ड इन्कम फंड्समधील ही घसरण आश्चर्यकारक नाही असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे. जूनमध्ये संपणाऱ्या तिमाहीत अशा प्रकारची घसरण पहायला मिळते. फक्त आता ती सर्वाधिक आहे असे सूत्रांनी सांगितले. कार्पोरेट कंपन्या यासाठी अधिक जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच फ्लो कमी झाल्याचे सांगण्यात येते. ट्रेझरी बिल, डिपॉझिट प्रमाणपत्र, कमर्शिअल पेपर यातून मे महिन्यात 61,870 कोटींचा फ्लो दिसून आला होता. कमी कालावधीच्या कॅटॅगिरीत 12,236 कोटी रुपये तर कार्पोरेट बाँड फंड्समध्ये 10,737 कोटी रुपयांची गुंतवणूक दिसून आली. 
सध्याच्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जोखमीच्या गुंतवणूकीपेक्षा लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. क्रेडिट रिस्क आणि मीडियम कॅटॅगीरीचा यात समावेश आहे. मनी मार्केट, कमी कालावधी आणि कार्पोरेट बाँड, बँकिंग, पीएसयू आदी कॅटॅगिरी ग्राहकांना आकर्षित करतात. एकूणच म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये गेल्या महिन्यात सर्वच कॅटॅगिरीत 7,265 कोटींची उलाढाल दिसून आली आहे, ती मे महिन्याच्या तुलनेत 70,813 कोटींपेक्षा खूप कमी आहे. कोरोना महामारीने अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात, पगारातील रिडक्शन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही कॅटॅगिरीत गुंतवणूक घसरू लागली आहे. 

News-In-Focus