आयपीओंचे मार्केट तेजीत, वर्षभरात येणार 15 कंपन्या 

आयपीओंचे मार्केट तेजीत, वर्षभरात येणार 15 कंपन्या 

गेल्या वर्षी, सन 2020 मध्ये इनिशिअल पब्लिक ऑफरचे (आयपीओ) मार्केट तेजीत राहिले. आर्थिक तरलतेची सर्वोत्तम स्थिती आणि गुंतवणूकदारांचा उत्साह यातून अनेक कंपन्यांनी गेल्या वर्षी आयपीओंच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे भांडवल उभारले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी, 2021 मध्ये आयपीओंचा बाजार तेजीत राहील अशी शक्यता आहे. अनेक कंपन्या आयपीओ दाखल करण्यासाठी सज्ज आहेत. यावर्षी किमान 15 आयपीओ मार्केटमध्ये दाखल होतील. त्यापैकी सहा आयपीओ या महिन्यातच येतील अशी शक्यता आहे. 

आयपीओच्या बाजारातील चढ-उतार अद्याप कमी झालेला नाही. यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार चांगले पैसे कमवू शकतील. याआधी 2019 मध्ये 16 आयपीओंच्या माध्यमातून 12,362 कोटी रुपये जमा झाले होते. तर त्यापूर्वी 2018 मध्ये तब्बल 24 कंपन्यांनी आयपीओंमधून 30,959 कोटी रुपये जमवले होते. गेल्यावर्षी कंपन्यांनी प्रायमरी मार्केटमधून 31,000 कोटी रुपयांची उभारणी कंपन्यांनी केली. वर्षभरात एकूण 16 आयपीओ दाखल झाले. त्यापैकी 15 आयपीओ दुसऱ्या सहामाहीत दाखल झाले. यावर्षी किमान पंधरा कंपन्यांचे आयपीओ दाखल होतील. हे वर्ष यासाठी चांगले असेल अशी अपेक्षा आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओही या वर्षात येऊ शकतो. हा आयपीओ सर्वात मोठा असू शकेल. याशिवाय इंडियन रेल्वे फायनान्स कार्पोरेशनचा साडेचार हजार कोटींचा आयपीओ असेल. कल्याण ज्वेलर्स, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रिज, इंडिगो पेंट, क्राफ्ट्सम ऑटोमेशन, ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलीटी, एपीजे सुरेंद्र पार्क होटल्स, होम फर्स्ट फायनान्स कंपनी, रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया, साहमी होटल्स, श्याम स्टील, अन्नाई इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपन्यांचा यात समावेश आहे.

यापैकी इंडिगो पेंट, एपीजे सुरेंद्र पार्क होटल्स, इएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ प्रत्येकी एक हजार कोटींचा असेल. तर साहमी होटल्सचा आयपीओ दोन हजार कोटींचा असणार आहे. होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा आयपीओ पंधराशे कोटी रुपयांचा असणार आहे. यापूर्वी दाखल झालेले काही आयपीओ दीडशे ते दोनशे पट सबस्क्राइब झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आताही आयपीओचे मार्केट तेजीतच राहण्याची शक्यता आहे. 
 

News-In-Focus