सुलभता हे ‘सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चे खास वैशिष्ट्य

सुलभता हे ‘सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चे खास वैशिष्ट्य

    ग्राहक एखादे उत्पादन खरेदी करताना जास्तीत जास्त फिचर्स / वैशिष्ट्य  असलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतात. कार असो, मोबाइल फोन असो  किंवा घर, अधिक वैशिष्ट्ये असणे हे चांगले मानले जाते. परंतु जेव्हा गुंतवणूकीसंबंधीच्या आर्थिक उत्पादनांचा विचार केला जातो, तेव्हा अधिक वैशिष्ट्ये / फिचर्स फायद्यापेक्षा समस्याचे कारण बनू शकते.अधिक फिचर्समुळे  उत्पादनात अस्पष्टता आणि गुंतागुंत निर्माण होते. म्युच्युअल फंड, एसआयपी (पद्धतशीर गुंतवणूक योजना / सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) यासारख्या वित्तीय उत्पादनांमध्ये अधिक फिचर्सच्या लोभामुळे समस्या वाढते. जेव्हा  काही उत्पादनांचे अस्तित्व सुलभता आणि सहजतेवर अवलंबून असते, तेव्हा ही समस्या अधिक गंभीर होते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीतून उच्च परतावा मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केटच्या चढ-उताराचा विचार न करता दिर्घकाळासाठी सातत्याने गुंतवणूक करत राहणे. 
    ‘एसआयपी’मागील समान तत्व हे आहे की शेअर बाजारातील परिस्थितीच्या अभ्यासाशिवाय आपण स्टॉक-आधारित म्युच्युअल फंड योजनेत नियमित गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे. काही कालावधीनंतर आपल्याला आढळेल की, आपण बाजारात मंदीच्या काळात अधिक युनिट विकत घेतल्या आणि  बाजारपेठेतील तेजीच्या काळात कमी युनिट्स खरेदी केली गेली. ‘एसआयपी’ची ही पध्दत आपली सरासरी खरेदी किंमत लक्षणीयरीत्या कमी करेल. अशाप्रकारे, काही वर्षाच्या सातत्यपूर्ण गुंतवणूकीनंतर ज्यावेळी आपण बाजारातून आपली गुंतवणूक काडून घेवू, त्यावेळी आपल्या पैशामध्ये लक्षणीय वाढ झाली असण्याची  शक्यता असते. तथापि, यात कोणतीही हमी नाही, निश्चित परताव्याची आशा नाही. कल्पना करा, जर स्टॉक मार्केट दीर्घ कालावधीत बराच काळ  स्थिर राहिले  किंवा मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळले तर ‘एसआयपी’चे हे तत्व लागू होणार नाही. परंतु  जर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला असेल आणि पुन्हा उसळी घेवून वर आला  असेल  तर दीर्घ कालावधीत आपल्याला त्याचा जास्तीत जासत फायदा मिळेल, यात दुमत नाही. 
    कोणत्याही ‘एसआयपी’चे मूल्य गणित नसून ते मानसशास्त्र असते. बाजारामध्ये गुंतवणूक कधी करावी, कधी करू नये आणि गुंतवणूकीची उत्तम संधी गमावण्याची चिंता न करता शेअर बाजाराकडून सर्वात चांगला परतावा मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे ‘एसआयपी’ होय. त्याचे गणित अगदी सोपे आहे की, आपण नियमितपणे ठरावीक रकमेची  गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. परंतु म्युच्युअल फंड बाजारपेठेतील काही संस्था गुंतवणूकदारांना भुरळ घालण्यासाठी त्यांना  बरेच पर्याय देण्याचा प्रयत्न करतात. मार्केटमध्ये ‘एसआयपी’च्या अनेक योजना आहेत, ज्यात बाजाराची वेळ वैशिष्ट्य म्हणून जोडली गेली आहे. अशा अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आणि सल्लागार आहेत जे ‘एसआयपी’ची रक्कम निर्देशांक पातळीवर किंवा पीई किंवा इतर कोणत्याही आधारावर कमीतकमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याचा दावा करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकदा जर ‘एसआयपी’ करण्याचा निर्णय घेतला, तर त्यामध्ये कुठलाही खंड न पडता गुंतवणूक करत राहणे. शेअर बाजार कोसळू दे किंवा उसळी घेवू दे, त्याकडे लक्ष न देता सलग काही वर्षे जर आपण ‘एसआयपी’ सुरू ठेवली तर त्याचा परतावा नक्‍कीच चांगला मिळतो. 
(Published On 29/02/2020)

News-In-Focus