घर खरेदी करण्यापूर्वी विचार करा या गोष्टींचा...

घर खरेदी करण्यापूर्वी विचार करा या गोष्टींचा...

    युष्यभराची कमाई जर घर खरेदीमध्ये गुंतवली असेल आणि तरीही घर मिळाले नसेल तर अशा व्यक्‍तीचं किेवा अख्ख्या कुटुंबाची स्थिती काय  होवू शकते, याचा अंदाज आल्याशिवाय रहात नाही. हक्‍काच्या घरकुलाचं स्वप्न पूर्ड करण्यासाठी अनेकांनी पोटाला चिमटा  पैपै जमवलेली असते. स्वत: राहण्यासाठी घर खरेदी करणे आणि केवळ गुंतवणूक म्हणून घर खरेदी करणे यात मोठा मुलभूत फरक असतो. हा फरक समजून घेतल्याशिवाय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. त्यामुळेच अनेक बिल्डर्स ग्राहकांच्या या द्विधा मनस्थितीचा फायदा उठवत असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूकही होते. सर्वसामान्य भारतीयांचा सर्वात मोठा आर्थीक निर्णय हा घर खरेदीचाच असतो. कारण बहुतांश लोकांची आयुष्यात एकदाच घर विकत घेण्याची क्षमता असते. 
    2000 सालापासून बहुतांश लोकांची अशी धारणा झाली आहे की, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक कमी जोखमीची आणि सर्वात जास्त परतावा देणारी आहे. परंतु वस्तुस्थिती त्याच्या विपरीत आहे. 2000 पासून बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून मिळणार्‍या व्याजामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली कपात, घर खरेदीला आयकरामध्ये मिळालेली सुट आणि नोकरदारांचे वाढलेले भरघोस पगार यामुळे  नोकरदारांना घर खरेदी करणे सहजशक्य होवू लागले. त्यातून एकापेक्षा अनेक घरांची खरेदी करून त्यातून नफा कमाविण्याची वृत्ती वाढीस लागली. सुरूवातीच्या काही वर्षात लोकांना त्यात अमाप फायदाही झाला. अनेकजन लखपती आणि करोडपतीही झाले. 
    रिअल इस्टेट उद्योग घर खरेदीदारांचा अचानक वाढलेला फुगवटा समजण्यात अपयशी ठरला. त्यामुळे रिअल इस्टेटमधील चलतीचा कृत्रिम फुगा फुटला आणि आजच्या घडीला हजारो ग्राहक अद्याप त्यांच्या पदरात न पडलेल्या घराचा हप्‍ता भरत आहेत. काही प्रकल्पांना तर कसलेच भविष्य उरलेले नाही, त्यामध्ये   हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. 
    विशेष म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आलेली महामंदी ही काही अचानक आलेली नाही, हा सर्व काही नफेखोरांनी खेळलेला पध्दतशील डाव आहे. या डावात सर्वसामान्य ग्राहक निष्कारण भरडले जात आहेत. कुठल्याही रिअल इस्टेटची किंमत अशीच वाढत नाही. त्यासाठी 5 प्रमुख घटक कारणीभूत असतात.
    1) जमिनीच्या प्रकारात बदल करणे. शेती योग्य जमीन प्लॉटसाठी विकसीत करणे. 2) संबंधित जमिनीच्या आसपास मोठ्या प्रमाणात मुलभूत सुधारणा होणे. 3) संबंधित जमिनीच्या आसपास लोकसंख्येत झपाट्याने वाढ होणे आणि   आसपासच्या लोकांचा जीवनस्तर उंचावणे. 4) रिअल इस्टेटवर प्रभाव टाकणार्‍या तेजी-मंदीच्या लाटेतून जाणे. 5) अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा, जेणेकरून जाागांच्या किंमतीही गगनाला भिडतात. 
    मागील पिढ्या अगदी सुरूवातीच्या काळातच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत होत्या. त्यामुळे त्यांना वर 2 ते 5 क्रमांकावर उल्‍लेख केलेले फायदे दोन ते तीन दशकात मिळत होते. परंतु आता आपण जो फ्लॅट खरेदी करतो, तो फ्लॅट आपण डेव्हलपरकडून खरेदी करतो. या नव्या प्रकारात 1 ते 3 क्रमांकाचे सर्वच्या सर्व फायदे डेव्हलपर घेतो. उत्तर भारतातील काही डेव्हलपर घर खरेदीदारांकडून पैसे उचलतात आणि आपल्या दुसर्‍याच प्रोजेक्टमध्ये गुंतवतात. त्यामुळे अनेक ग्राहक वर्षानुवर्षे घराच्या प्रतिक्षेत आहेत, पण त्यांना अद्याप त्यांच्या घराचा ताबा मिळालेला नाही. 
    आता प्रश्‍न उरतो की अशा सर्व फसवणुकीच्या चक्रव्यूहात न फसता घर कसे खरेदी करायचे? त्याचे उत्तर असे आहे की आपण घर खरेदी करू शकतो, पण त्यासाठी काही नियम पाळण्याची आवश्यकता आहे. त्यातील पहिला नियम म्हणजे केवळ एकच घर खरेदी करा, ज्यामध्ये तुम्हाला स्वत:ला राहायचे आहेत. ज्यामुळे तुमचे भाड्यापोटी जाणारे पैसे वाचतील. दुसरा नियम म्हणजे केवळ गुंतवणूकीच्या उद्देशाने आपण दुसरे घर बिल्कुल खरेदी करू नये. जर आपण रिअल इस्टेटमधील गुंतवणूकदार असला तर आपण हा लेख वाचणे इथेच थांबवावे. कारण हा लेख रिअल इस्टेटमधील गुंतवणूकदारांसाठी नसून सर्वसामान्य ग्राहकांसाठी आहे. 
    दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आर्थीक कुवतीपेक्षा जास्त किमंतीचे घर खरेदी करू नये. आपल्या  एकूण उत्पन्‍नातील एक तृतीयांशपेक्षा जादा हिस्सा घराचा इएमआय / हप्‍ता नसावा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घर किंवा फ्लॅट अशाच बिल्डरकडे बुक करा, जो तुम्हाला वेळेवर त्याचे पझेशन देईल. काही बिल्डर ग्राहकांना मोठ मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून घर किंवा फ्लॅट घेण्यास भाग पाडतात, पण अशा व्यवहारामध्ये ग्राहकांना फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याचा धोका असतो. त्यामुळे घेताना पारदर्शी व्यवहार, योग्य बिल्डर, घराची स्वत:ला परवडेल अशी किंमत आणि वेळेवर पझेशनची खात्री आदी बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. 
(Published On 22/02/2020)

News-In-Focus