म्युच्युअल फंड थेट खरेदीची सेबीकडून मुभा 

म्युच्युअल फंड थेट खरेदीची सेबीकडून मुभा 
नवी दिल्ली (27 डिसेंबर) : बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून थेट म्युच्युअल फंड खरेदी आणि रिडीम करण्याचे अधिकार दिले आहेत. या निर्णयामुळे स्टॉक एक्सेंजच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा गुंतवणूकदार थेट वापर करू शकणार आहेत. गुंतवणूकीच्या सर्व स्तरांचा अधिकाधिक वापर व्हावा अशी यामागील भूमिका असल्याचे सेबीने आपल्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे. 
यापूर्वी सेबीने म्युच्युअल फंड वितरकांना ऑक्टोबर 2013मध्ये तर इन्व्हेस्टमेंट अॅटव्हायझर्सना ऑक्टोबर 2016मध्ये म्युच्युअल फंडाच्या खरेदी-विक्रीसाठी स्टॉक एक्स्चेंजचा वापर करण्यास अनुमती दिली होती. त्यापूर्वी फक्त ब्रोक्सना म्युच्युअल फंडाच्या देवाण-घेवाणीसाठी एक्स्चेंजच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची परवानगी होती. सेबीने यापूर्वी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठीही विविध उपाययोजना केल्या आहेत. म्युच्युअल फंड्समधील युनिट्सच्या देवाण-घेवाणीमध्ये गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवलेल्या पूल अकाउंटचा वापर बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात आला होता. कार्वी स्टॉक ब्रोकिंगमधील घोटाल्याच्या प्रकारानंतर सेबीने ब्रोकर्स आणि क्लिअरिंग कार्पोरेशनच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट वापरावर निर्बंध लागू केले आहेत. गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता कायम रहावी यासाठी असे उपाय लागू केले गेले आहेत. अनेकदा सिक्युरिटीजकडून शेअर्सचा वापर कर्जासाठीही केला गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना थेट मुभा देऊन सेबीने नवे पाऊल उचलले आहे. 

News-In-Focus