अडचणीच्या काळात ओव्हरड्राफ्टचा आधार

अडचणीच्या काळात ओव्हरड्राफ्टचा आधार
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. काहीजणांच्या व्यवसायात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे लोकांना पैशांसंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा काळात जर पैशांची गरज भासली आणि आपले बँक अकाउंट रिकामे असेल तर काय करावे असा प्रश्न पडतो. अशावेळी ओव्हरड्राफ्ट ही बँकिंग सुविधा खूप मोठा आधार ठरते. 

नियमित बँकिंग व्यवहार करणारी व्यक्ती ओव्हरड्राफ्टच्या सुविधेच्या माध्यमातून जेव्हा आपले अकाउंट बॅलन्स शू्न्य असेल अशावेळीही अकाउंटमधून पैसे काढू शकतो. अर्थात यासाठी तुम्हाला थोडे व्याजही भरावे लागेल. ओव्हरड्राफ्टची सुविधा जवळपास सर्वच बँकां आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या (एनबीएफसी) देतात. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा उठवण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन अथवा ऑनलाइन अॅप्लिकेशन करता येते. काही बँका या सुविधेसाठी एक टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारतात. बँका आपल्या काही ग्राहकांना ही सुविधा अॅटोमेटिक परवतात, तर काही बँकांमध्ये ग्राहकांना या सुविधेसाठी अॅप्लिकेशन करावे लागते.

जर आपल्या बँकेमध्ये पहिल्यापासूनच जर ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली गेली असेल तर तुम्ही जेव्हा गरज भासेल अशा वेळी ओव्हरड्राफ्ट अकाउंटमधून पैसे काढू शकता. हे पैसे तुमच्या ओव्हरड्राफ्ट अकाउंटमध्ये जमा होतील. ओव्हरड्राफ्टची रक्कम किती असेल हे ग्राहकावर अवलंबून असेल. जशा पद्धतीने क्रेडिट कार्डचे बिल भरले जाते अशा पद्धतीने ही रक्कम तुम्हाला फेडावी लागते. जोपर्यंत तुम्ही पूर्ण रक्कमेची परतफेड करत नाही, तोपर्यंत व्याजवसुली सुरू राहील. आउटस्टँडिंग रक्कमेवर दररोजच्या हिशोबाने व्याज लावले जाते. जस जसे तुम्ही अकाउंटमध्ये पैसे भरत जाता, तसतशी थकबाकी कमी होते. यावर रोजच्या हिशोबाने व्याज वसुली केली जाते. 

कशी असते ओव्हरड्राफ्टची प्रक्रिया ?

ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार ओव्हरड्राफ्ट दिला जातो. हे एक प्रकारचे कर्जच असते, ज्यावर बँकेकडून व्याज वसुली केली जाते. ओव्हरड्राफ्ट गॅरंटी आणि विना गॅरंटी अशा दोन्ही प्रकारचे मिळू शकते. ग्राहकाचे बँकेशी कसे संबंध आहेत, यावर हे अवलंबून राहते. ग्राहक आपल्या मासिक वेतनावर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतो. साधारणतः पगाराच्या 2-3 पट ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. म्हणजे तुमचा मासिक पगार एक लाख रुपये असेल तर तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळेल. सॅलरी अकाउंट असलेल्या बँकेमध्येच तुम्हा एखाद्या शॉर्ट टर्म लोनप्रमाणे हे पैसे तुम्हाला मिळू शकतात. घर खर्चासाठीही ओव्हरड्राफ्ट घेता येतो. एकूण मालमत्तेच्या 50 ते 60 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट व्हॅल्यू असते. मात्र हे पैसे देण्यापूर्वी बँकेकडून तुमची कर्ज फेडण्याची क्षमता आणि क्रेडिट स्कोअरचे मूल्यमापन केले जाते. ग्राहक आपल्या इन्शुरन्स पॉलिसीवरही ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतो. तुमच्या विम्याच्या व्हॅल्यूएशनवर याची रक्कम ठरते. याशिवाय फिक्स्ड डिपॉझिटवरही त्या रक्कमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. एफडीवर घेतलेल्या ओव्हरड्राफ्टला व्याजही कमी आकारले जाते. बँका एफडीच्या व्याजावर दोन टक्के जादा व्याज आकारतात. इतर सर्व प्रकारच्या ओव्हरड्राफ्टची प्रक्रिया गतीने होते. मात्र, घरावरील ओव्हरड्राफ्टची प्रक्रिया संथ असू शकते. 
 

News-In-Focus